ब्रेकिंग: रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा काजू उत्पादकांसाठी ९८ कोटी ४४ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर

Gramin Varta
682 Views

कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २१० कोटींच्या मदतीचा शासन निर्णय निर्गमित

मुंबई: कडाक्याची थंडी आणि अवेळी पावसामुळे कोकण विभागातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला असून, नुकसान भरपाईपोटी तब्बल २०९ कोटी १० लाख ६ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. ऑक्टोबर २०२५ ते एप्रिल २०२६ या कालावधीत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ही मदत दिली जाणार असून, यात सर्वाधिक ९८ कोटी ४४ लाख रुपयांचा निधी केवळ रत्नागिरी जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे रत्नागिरीसह कोकणातील सुमारे १ लाख ३४ हजार २५१ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

महसूल व वन विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात (DBT द्वारे) जमा केली जाणार आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषांनुसार हे अनुदान वितरित करण्यात येणार असून, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना आवश्यक त्या सूचना देऊन ही रक्कम कर्ज खात्यात वळती होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. 

या निधीच्या वाटपाबाबत तहसीलदारांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने दुहेरी लाभ होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून, या निधीमुळे आगामी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. 

- Advertisement -

Total Visitors :
4820446
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *