मिऱ्या-नागपूर महामार्गाच्या निकृष्ट कामाची पोलखोल; गणेश कॉलनीतील बोगदा झाला जलमय, नव्या संरचनेतूनच पाण्याची झिरप सुरू

Gramin Varta
605 Views

रत्नागिरी /अजय सावंत : मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसाने मिऱ्या-नागपूर महामार्गावरील कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. शहरालगतच्या नाचणे परिसरातील जेके फाईल ते टीआरपी दरम्यानच्या महामार्गावरील एका बाजूचा सर्व्हिस रोड अद्याप अपूर्ण अवस्थेत असून, गणेश कॉलनी येथील महामार्गाखालील बोगदा (अंडरपास) अक्षरशः तलावात रूपांतरित झाल्याचे चित्र समोर आले आहे.

विशेष म्हणजे नुकत्याच बांधण्यात आलेल्या या बोगद्याच्या छत व सांध्यांमधून पाणी झिरपत असल्याचे दिसून येत असून, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

या महामार्गाचा दर्जा सुधारावा,  यासाठी वारंवार वृत्तांकन करण्यात आले होते. मात्र संबंधित कंत्राटदार कंपनीकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. अवघ्या दोन-तीन दिवसांच्या पावसातच अनेक त्रुटी समोर आल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, पाऊस सुरू होताच अनेक ठिकाणी काम बंद पडल्याचे दिसून आले असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठीही त्रास सहन करावा लागत आहे. यासोबतच स्थानिक लोकप्रतिनिधींच्या भूमिकेबाबतही नाराजी व्यक्त होत आहे.

नाचणे गणेश कॉलनी येथील अंडरपास हा एका सर्व्हिस रोडवरून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी महत्त्वाचा दुवा म्हणून उभारण्यात आला आहे. मात्र पावसामुळे तो पूर्णपणे जलमय व चिखलयुक्त झाला असून नागरिकांच्या वापरासाठी अयोग्य ठरत आहे. त्यातच परिसरातील भटक्या गुरांचाही वावर वाढल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
बोगद्याच्या छतामधून सुरू झालेली पाण्याची झिरप ही केवळ तांत्रिक त्रुटी नसून भविष्यातील संरचनात्मक धोक्याची पूर्वसूचना मानली जात आहे.

तज्ज्ञांच्या मते, महामार्गाखालील बोगदा हा अत्यंत महत्त्वाचा अभियांत्रिकी घटक असतो. काँक्रिटीकरण, जलरोधकता (Waterproofing), ड्रेनेज व्यवस्था आणि संरचनात्मक मजबुती यामध्ये त्रुटी राहिल्यास पुढील काळात भेगा पडणे, काँक्रीट सोलणे, लोखंडी सळ्यांना गंज लागणे तसेच संरचनेची ताकद कमी होणे अशा गंभीर समस्या उद्भवू शकतात. भारतीय मानके (IS Codes), जलरोधक तंत्रज्ञान, भार वहन क्षमता आणि सुरक्षिततेच्या निकषांचे काटेकोर पालन करणे अशा प्रकल्पांमध्ये बंधनकारक असते.

मिऱ्या-नागपूर महामार्गावरील काही ठिकाणी समोर आलेल्या त्रुटी आणि निकृष्ट दर्जाच्या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने महामार्गाची पाहणी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

“महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेची तातडीने स्वतंत्र तांत्रिक तपासणी करून दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी,” अशी एकमुखी मागणी स्थानिक नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

Total Visitors :
4576817
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *