तुरळ फाट्यावरील जीवघेणा खड्डा वाहनचालकांच्या मृत्यूचा सापळा; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर संताप

Gramin Varta
265 Views

कडवई: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तुरळ फाटा येथे रस्त्याच्या मध्यभागी पडलेला भला मोठा आणि खोल खड्डा आता वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे. येथे दिवसेंदिवस अपघात घडत असून, सातत्याने पाठपुरावा करूनही संबंधित प्रशासनाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

तुरळ फाटा हा कडवईसह अनेक गावांचा मुख्य संपर्कमार्ग आहे. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यामुळे या खड्ड्याची खोली वाहनचालकांना समजत नाही, परिणामी वाहने थेट खड्ड्यात कोसळून अपघात होत आहेत. अवघ्या चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी कोळसा वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला होता, तर आज पुन्हा दोन वाहने खड्ड्यात अडकल्याची घटना घडली. सुदैवाने आतापर्यंत मोठी जीवितहानी टळली असली तरी, प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहिली जात असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या ठिकाणाजवळ शाळा असून दररोज शेकडो विद्यार्थी येथून ये-जा करतात. रस्ता ओलांडताना विद्यार्थ्यांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. ग्रामपंचायत आणि लोकप्रतिनिधींनी वारंवार मागणी करूनही महामार्ग प्राधिकरण किंवा ठेकेदाराकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. केवळ खड्डा भरण्याच्या पोकळ आश्वासनांचे वाटप करून प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे.

केवळ कागदोपत्री फाईल फिरवणाऱ्या प्रशासनामुळे आता नागरिकांचा संयम सुटला आहे. वारंवार तक्रारी करूनही दुरुस्तीचे काम केले जात नसल्याने स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आता तरी संबंधित यंत्रणेला जाग येणार का, की एखाद्या निष्पाप प्रवाशाचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाचे डोळे उघडणार, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. वेळीच दुरुस्ती न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशाराही परिसरातील नागरिकांनी दिला आहे.

Total Visitors :
4576526
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *