रत्नागिरीत एसटी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न; ज्येष्ठ सभासदांचा विशेष सन्मान

Gramin Varta
375 Views

रत्नागिरी: शहरातील दत्त मंगल कार्यालयात रविवारी एसटीच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा तालुकास्तरीय स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. रत्नागिरीतील विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा, रत्नागिरी आगार आणि टीआरपी येथून सेवानिवृत्त झालेल्या सुमारे १५० हून अधिक कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यात आवर्जून उपस्थिती दर्शवली. शेखर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देत कर्मचाऱ्यांनी एकमेकांसोबत सुख-दुःखाच्या गोष्टी शेअर केल्या.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारत सावंत यांनी स्वागत गीत आणि महाराष्ट्र गीत सादर केले, तर राजकुमार प्रधान यांनी कविता आणि सुहास पेठे यांनी देशभक्तीपर गीतातून उपस्थितांची मने जिंकली. मेळाव्याचे प्रास्ताविक करताना विभागीय सचिव पी. एस. जाधव यांनी सेवानिवृत्त सहकाऱ्यांना एका व्यासपीठावर आणून त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हा या कार्यक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले. यावेळी संघटनेच्या केंद्रीय स्तरावर सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. प्रादेशिक सचिव विजयराव शिंदे यांनी संघटन शक्तीचे महत्त्व पटवून देताना प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संघटित राहण्याचे आवाहन केले. अशोक थत्ते यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित रक्कमेबाबत कायदेशीर आणि प्रशासकीय कार्यपद्धतीवर मार्गदर्शन केले.

या स्नेहमेळाव्यात जून महिन्यात वाढदिवस असलेल्या ४५ सेवानिवृत्त सभासदांचा शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच, सेवानिवृत्तीनंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सभासदांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात शेखर सावंत यांनी रत्नागिरी युनिटच्या कार्यकारिणीने मेळावा यशस्वी करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. उदय पारकर यांनी सूत्रसंचालन केलेल्या या कार्यक्रमाचे आभार एम. आय. शेकासन यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली, अशी माहिती राज्य प्रसिद्धी सचिव रत्नपाल जाधव यांनी दिली.

Total Visitors :
4828031
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *