सती चिंचघरी प्राथमिक विद्यालयात कोकण महोत्सव उत्साहात; पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा विद्यार्थ्यांना मिळाला परिचय

Gramin Varta
75 Views

चिपळूण: सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खेर्डी-चिंचघरी (सती) येथील प्राथमिक विद्यालयात नुकताच ‘कोकण महोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये कोकणातील समृद्ध खाद्यसंस्कृती, पारंपरिक प्रथा आणि राानमेव्याची ओळख करून देण्याच्या उद्देशाने ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी कोकणातील विविध फळे आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांची आकर्षक मांडणी करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

या प्रदर्शनात आंबा, फणस, काजू, आळू, जांभूळ, करवंद आणि रातांबे यांसारख्या रानमेव्यासोबतच फणसाचे विविध पदार्थ, आंबापोळी, फणसपोळी आणि कोकम यांसारख्या पारंपरिक खाद्यपदार्थांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी प्रत्येक पदार्थाची माहिती अत्यंत आत्मविश्वासाने मांडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ आपल्या संस्कृतीची ओळख झाली नाही, तर उद्योजकता, संवादकौशल्य, नियोजन आणि संघभावना यांचे प्रत्यक्ष शिक्षणही मिळाले.

शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये संस्कृती संवर्धनाची जाणीव निर्माण होण्यासोबतच त्यांच्यातील आत्मविश्वास आणि सर्जनशीलता विकसित होण्यास मदत होते. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी अपूर्वा शिंदे, वृषाली राणे आणि शितल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उपक्रमास पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी मोठी उपस्थिती लावून विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद प्रयत्नांचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक सकपाळ आणि शिक्षकवृंदांच्या सहकार्याने हा महोत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Total Visitors :
4827696
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *