वालावलकर रुग्णालयात रजोनिवृत्तीनंतरच्या आजारांवर विशेष उपचार; ग्रामीण महिलांना मिळणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन

Gramin Varta
215 Views

चिपळूण: वयाच्या एका विशिष्ट टप्प्यानंतर, विशेषतः रजोनिवृत्तीनंतर महिलांच्या शरीरात होणाऱ्या संप्रेरकीय बदलांमुळे त्यांना अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. ग्रामीण भागातील महिलांना याविषयी योग्य वैद्यकीय सल्ला मिळणे कठीण असते, ही बाब लक्षात घेऊन डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाने रजोनिवृत्तीनंतरच्या आजारांवर विशेष उपचार व समुपदेशन सुविधा सुरू केली आहे. या उपक्रमांतर्गत प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. सोनाली दामले यांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

रजोनिवृत्तीनंतर निद्रानाश, अस्वस्थता, चिंता, सतत थकवा जाणवणे आणि हाडे ठिसूळ होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. या बदलांचा परिणाम हृदयाच्या आरोग्यावरही होऊ शकतो. ग्रामीण भागातील महिला अनेकदा या त्रासाला केवळ वाढत्या वयाची लक्षणे समजून दुर्लक्ष करतात, मात्र योग्य वैद्यकीय सल्ला, संतुलित आहार आणि नियमित व्यायामाच्या मदतीने या समस्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. आरोग्य सुविधेच्या अभावामुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या कोकणातील महिलांना एकाच छताखाली तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे, या सामाजिक उद्देशाने रुग्णालयाने हे पाऊल उचलले आहे.

डॉ. सोनाली दामले या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रुग्णालयात उपस्थित असणार आहेत. या सुविधेचा लाभ घेऊन महिलांनी आपल्या आरोग्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहन बी. के. एल. वालावलकर रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी केले आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त महिलांनी या उपचारांचा आणि मोफत समुपदेशनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन रुग्णालयाच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Total Visitors :
4827205
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *