भाड्याचे निमित्त अन् सोन्याच्या चैनवर डल्ला; देवरुखात खळबळ

Gramin Varta
536 Views

देवरूख: रिक्षा भाड्याने घेण्याच्या बहाण्याने एका अनोळखी चोरट्याने ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पोबारा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २९ जून रोजी सायंकाळी संगमेश्वर तालुक्यातील मोर्डे खिंड ते ढवळवाडी रस्त्यावर घडली असून, या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

याप्रकरणी गंगाराम तुकाराम शिंदे (वय ६३, रा. कोंडगाव शिंदेवाडी) यांनी संगमेश्वर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिंदे यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करून रिक्षा भाड्याने हवी असल्याचे सांगून बोलावून घेतले होते. त्यांच्या सांगण्यावरून शिंदे हे रिक्षा घेऊन संबंधित ठिकाणी पोहोचले आणि त्या व्यक्तीला रिक्षात बसवून रवाना झाले. रिक्षा मोर्डे खिंड येथून सुमारे २०० मीटर अंतरावर पोहोचताच, त्या प्रवाशाने शिंदे यांना रिक्षा थांबवण्यास सांगितली. रिक्षा थांबताच त्याने काहीही समजण्याच्या आत शिंदे यांच्या गळ्यातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हाताने पकडून जोरात हिसका मारला. या अचानक झालेल्या हल्ल्याने शिंदे काहीसे गडबडले असता, चोरट्याने चैन हिसकावून रिक्षातून खाली उतरत घटनास्थळावरून पोबारा केला.

चोरीला गेलेल्या सोन्याच्या चैनची किंमत सुमारे ३५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच ३० जून रोजी पहाटे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, भारतीय दंड संहिता कायद्यानुसार अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला आहे. आपल्या रिक्षात बसलेल्या प्रवाशानेच लुटल्यामुळे रिक्षाचालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या धाडसी चोरीप्रकरणी पोलिस आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि संशयित व्यक्तीच्या मोबाइल कॉल डिटेल्सच्या आधारे तपास करत आहेत.

Total Visitors :
4576951
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *