महागाईची कात्री फिरली, शिलाईची किंमत वाढली; रत्नागिरीत शिलाईच्या दरात वाढ!

Gramin Varta
231 Views

रत्नागिरी : वाढती महागाई आता थेट शिलाई व्यवसायावरही परिणाम करू लागली असून, वाढत्या खर्चामुळे रत्नागिरीतील शिलाई व्यावसायिकांनी शिलाईच्या दरात सुमारे दहा टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कपडे शिवून घेणाऱ्या ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
इंधन दरवाढ, वाढलेली वीजबिले, दुकानांची वाढती भाडी, तसेच शिलाई व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्यांच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे टेलर व्यावसायिकांपुढे आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. धागे, बटणे, झिप, अस्तर कापड, सुया, मशीनचे सुटे भाग आणि देखभाल खर्चात झालेली वाढ लक्षात घेता, दरवाढ अपरिहार्य असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

स्थानिक स्तरावर साध्या शर्टच्या शिलाईसाठी आतापर्यंत ३५० ते ४०० रुपये, तर पँटसाठी ४५० ते ६०० रुपये आकारले जात होते. नव्या दरवाढीनंतर शर्ट आणि पँटच्या शिलाईसाठी ग्राहकांना ५० ते १०० रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. ब्लाउज शिलाईचे दरही टेलरनुसार वाढले असून, त्यासाठी २०० ते ५०० रुपये आकारले जात आहेत.

एकीकडे वाढत्या खर्चाचा सामना करताना दुसरीकडे कमी किमतीतील रेडीमेड कपड्यांमुळे पारंपरिक शिलाई व्यवसायासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी अनेक शिलाई व्यावसायिकांना अत्यल्प नफ्यावर काम करावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, आगामी सण-उत्सव, लग्नसराई तसेच शालेय गणवेशांच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवर या दरवाढीचा थेट फटका ग्राहकांना बसणार असून, महागाईची कात्री आता कपड्यांच्या शिलाईवरही चालू लागल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4826999
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *