कोंढे ग्रामपंचायतीचा राष्ट्रीय महामार्ग विभागाला सज्जड इशारा; मोऱ्या दुरुस्ती व खड्डे बुजविण्याची मागणी

Gramin Varta
160 Views

चिपळूण: कोंढे ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या गुहागर–विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील मोऱ्यांची दुरवस्था, साचलेले गटार आणि रस्त्यावरील धोकादायक खड्डे तातडीने दुरुस्त करण्यात यावेत, अशी आक्रमक मागणी कोंढे ग्रामपंचायतीने राष्ट्रीय महामार्ग उपविभागाकडे केली आहे. यासंदर्भात २५ जून २०२६ रोजी उपविभागीय अभियंत्यांना लेखी निवेदन देण्यात आले असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात होणाऱ्या कोणत्याही दुर्घटनेची सर्वस्वी जबाबदारी महामार्ग विभागाची राहील, असा स्पष्ट इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.

ग्रामसभेच्या ठरावाचा संदर्भ देत ग्रामपंचायतीने म्हटले आहे की, महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही, परिणामी रस्त्याचे नुकसान होत आहे आणि वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. देवळाजवळील मोरी, जांभळी परिसरातील मोरी, चंदनवाडी येथील गटार सफाई, कुळेवाडी प्रवेशद्वार, कोंढे फाटा–लोलमवाडी आणि कोंढे बौद्धवाडी येथील मोऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, महामार्गावरील खड्डे अपघातांना निमंत्रण देत आहेत. मागील वर्षी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेण्यात न आल्याने ग्रामपंचायतीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून ही कामे तातडीने पूर्ण करावीत आणि त्याबाबतची लेखी माहिती ग्रामपंचायतीला द्यावी, अशी मागणी कोंढे ग्रामपंचायतीने केली आहे. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण असून, पावसाळी सुरक्षेसाठी महामार्ग विभागाने तातडीने पावले उचलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Total Visitors :
4827725
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *