रत्नागिरी जिल्ह्यातील १३२ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद आक्रमक; २५ कोटींच्या प्रस्तावासोबत मंत्र्यांकडे करणार पाठपुरावा

Gramin Varta
127 Views

रत्नागिरी: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत गंभीर दखल घेत, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीने २५ कोटी रुपयांच्या विशेष दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम समितीचे सभापती आणि उपाध्यक्ष विलास चाळके यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात सध्या ग्रामीण भागातील तब्बल १३२ रस्ते नादुरुस्त असून, यामुळे एस.टी. वाहतुकीसह ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.

या समस्या मार्गी लावण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येणार आहे. यापूर्वी रस्त्यांच्या कामांसाठी १६७ कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, मात्र अद्याप निधी प्राप्त झालेला नाही.

याशिवाय, जिल्ह्यातील पाइपलाइनच्या कामासाठी करण्यात आलेल्या रस्ते खोदाईमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा मुद्दाही बैठकीत चर्चेला आला असून, संबंधित कंपनीकडून निधी वाढवून मिळावा, असा ठरावही यावेळी घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी पालकमंत्री लवकरच तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती उपाध्यक्ष विलास चाळके यांनी दिली असून, प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा तीव्र करण्यात येणार आहे.

- Advertisement -
Total Visitors :
4827004
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *