बीडच्या सरपंच हत्याकांडातील मुख्य आरोपी १८ महिन्यांपासून फरार; तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

Gramin Varta
34 Views

बीड:  मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्याकांडातील प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे गेल्या १८ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देऊन फरार आहे. या प्रकरणातील अन्य सात आरोपी सध्या बीड आणि लातूर येथील कारागृहात असताना, मुख्य संशयित आरोपी आंधळे अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खंडणी आणि राजकीय वादातून संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते आणि आरोपींच्या अटकेसाठी मोठ्या प्रमाणावर जनआंदोलने उभी राहिली होती. पोलिसांनी सुरुवातीला अनेक आरोपींना अटक केली असली तरी, कृष्णा आंधळे सातत्याने आपली ठिकाणे बदलत असल्याने तो तपास यंत्रणेला हुलकावणी देत आहे.

या संदर्भात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी खळबळजनक दावा केला आहे. आंधळे हा थेट गुन्ह्यात सहभागी असल्याने त्याच्याकडे घटनेचे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता सीआयडीने व्यक्त केली आहे. एवढी मोठी तपास यंत्रणा कार्यान्वित असतानाही आरोपी सापडत नाही, तर त्याला कोणी पाठीशी घालत आहे का? असा सवाल उपस्थित करत धनंजय देशमुख यांनी पोलिसांना सत्य परिस्थिती मांडण्याचे आवाहन केले आहे. या फरार आरोपीचा ठावठिकाणा सांगणाऱ्या नागरिकाला १ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर आवाहन सीआयडीने केले आहे. मात्र, त्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही. दुसरीकडे, कृष्णा आंधळे स्थानिक लोकांच्या संपर्कात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. संशयीत व्यक्तींचे कॉल रेकॉर्डिंग आणि सीडीआर (CDR) तपासल्यास आरोपीचा पत्ता त्वरित लागू शकेल, असा विश्वासही स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. आता या खटल्यात मुख्य आरोपीला अटक करून पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळणार, याकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4576952
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *