गिरिजा राऊत छळ प्रकरण: अघोरी कृत्यांचा सूत्रधार भोंदू बाबा फिरोज शेखला १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

Gramin Varta
279 Views

ठाणे: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी पती, सासू, सासरे आणि भोंदू बाबांविरोधात केलेल्या गंभीर तक्रारीनंतर या प्रकरणाने आता वेग घेतला आहे. या छळ प्रकरणात संशयित आरोपी असलेला भोंदू बाबा फिरोज शेख याला ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने १४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शारीरिक आणि मानसिक छळ, तसेच अपत्यप्राप्तीसाठी अघोरी प्रथांचा अवलंब केल्याचा धक्कादायक आरोप गिरिजा राऊत यांनी केला असून, या प्रकरणातील तपासाला आता मोठी गती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित असूनही अपत्य होत नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी गिरिजा राऊत यांना जादूटोणा आणि अघोरी प्रथांच्या जाळ्यात ओढले. या कृत्यांमध्ये त्यांना जबरदस्तीने सामील करून घेत त्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. या गंभीर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पती गीतेश राऊत, विनायक राऊत, सासू आणि भोंदू बाबा फिरोज शेख यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी सिंधुदुर्ग येथील एका ठिकाणाहून फिरोज शेख याला अटक केली. कारवाईवेळी स्वतः तक्रारदार गिरिजा राऊत उपस्थित होत्या. पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता, तिथे अघोरी कृत्यांसाठी वापरले जाणारे लिंबू, टाचण्या आणि काही संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे.

न्यायालयात सुनावणीदरम्यान पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी सहा दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी फिरोज शेख याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोप फेटाळून लावत आपला अशिल केवळ दर्ग्याची देखभाल आणि पूजा करतो, तिथे कोणताही अघोरी प्रकार घडला नसल्याचा दावा केला. मात्र, पोलिसांनी न्यायालयात सादर केलेले पुरावे आणि या प्रकरणाचे गांभीर्य पाहता, ही पोलीस कोठडी महत्त्वाची मानली जात आहे. अघोरी कृत्यांमागे आणखी कोणाचे हात आहेत आणि या कटात नेमका कोणाचा सहभाग आहे, याचा शोध आता पोलीस घेणार आहेत. या प्रकरणाने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, तपासाच्या पुढील टप्प्यात काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4576726
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *