पाचलच्या तेजस जाधवचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

Gramin Varta
455 Views

पनवेल: जनार्धन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू कान्हा ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सोमवारी, १३ जुलै रोजी कै. चांगू कान्हा ठाकूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात फेब्रुवारी/मार्च २०२६ मधील माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पाचल गावचे सुपुत्र आणि शाळेचा विद्यार्थी कुमार तेजस तुषार जाधव (पाचलकर) याने नॅशनल मिन्स कम मेरिट स्कॉलरशिप (N.M.M.S.) परीक्षेत चमकदार कामगिरी करत जिल्ह्यात ३२ वा व शाळेत तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक कैलास सत्रे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले.

या सोहळ्याला संस्थेचे कार्याध्यक्ष व माजी खासदार रामशेठ ठाकूर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मुंबई विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुभाष बोरसे, संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, उप-कार्याध्यक्ष वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे, नगरसेविका राजश्री वावेकर, पर्यवेक्षक हरिश्चंद्र ठाकूर, अजित सोनवणे, स्वाती पाटील, मुख्याध्यापक कैलास म्हात्रे, प्र. मुख्याध्यापिका स्वाती काळे, प्रशांत मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तेजस जाधवचा शैक्षणिक प्रवास अत्यंत जिद्दीचा राहिला आहे. त्याने पहिली ते तिसरीचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, पनवेल येथे पूर्ण केले. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात पाचल येथील जि.प. आदर्श शाळेत, तर पाचवी व सहावीचे शिक्षण सरस्वती विद्या मंदिर, पाचल येथे घेतले. इयत्ता सातवीमध्ये चांगू कान्हा ठाकूर विद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर त्याने आपल्या अभ्यासात सातत्य राखले आहे. सध्या तो इयत्ता नववीच्या ‘अ’ वर्गात शिकत असून अभ्यासासोबतच कला आणि क्रीडा क्षेत्रातही तो प्रविण्य मिळवत आहे. भविष्यात भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) अधिकारी होऊन आपल्या गावाचे व देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे ध्येय तेजसने उराशी बाळगले आहे. त्याच्या या यशाबद्दल पाचल परिसरासह शैक्षणिक वर्तुळातून त्याचे कौतुक होत आहे.

Total Visitors :
4576762
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *