छत्रपती संभाजीनगर हादरले; तुकाराम मुंढेंच्या FDA कडून २.९३ कोटींचे संशयास्पद खाद्यतेल जप्त

Gramin Varta
271 Views

छत्रपती संभाजीनगर :  पैठण येथील दोन खाद्यतेल निर्मिती युनिट्सवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या धाडीत तब्बल २ कोटी ९३ लाख ३५ हजार ६०३ रुपये किमतीचे संशयास्पद खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. राज्य अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली असून, या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पैठण येथील बागरिया ॲग्रो प्रॉडक्ट्स आणि छत्रपती संभाजीनगर येथील बागरिया व्हेजिटेबल प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनांवर ही संयुक्त कारवाई करण्यात आली.

तपासणीदरम्यान या युनिट्समध्ये पाम तेल, सोयाबीन, कापसाचे तेल आणि इतर अज्ञात वनस्पती तेलाचे मोठ्या प्रमाणावर साठे आढळले आहेत. उत्पादन परिसरात यंत्रांवर गंज, धूळ आणि घाणीचे थर साचलेले असून भिंती व फरशी अत्यंत अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, वापरलेल्या डब्यांमध्ये तेलाचे पुनर्पॅकेजिंग केले जात होते आणि कोणत्याही साठवण टाक्यांवर तेलाच्या प्रकाराबाबत लेबल नव्हते. या युनिट्समध्ये गुणवत्ता तपासणीसाठी आवश्यक असणारी कोणतीही प्रयोगशाळा किंवा तांत्रिक नोंदी नसल्यामुळे, कोणतीही खातरजमा न करताच हे तेल बाजारात वितरित केले जात असल्याचा गंभीर संशय निर्माण झाला आहे.

सहाय्यक आयुक्त डी. व्ही. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या दोन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या तेलाचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवाल प्राप्त होताच संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. जनआरोग्याशी खेळणाऱ्या अशा आस्थापनांविरुद्धची मोहीम आगामी काळातही अधिक तीव्र केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Total Visitors :
4576793
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *