मैत्रीचा दुर्दैवी अंत: वादामुळे मित्रानेच केला मित्राचा निर्घृण खून; शिर आणि दोन्ही हात छाटून फेकले जंगलात

Gramin Varta
578 Views

ठाणे: मुंब्रा परिसरात मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून दोन मित्रांनी आपल्याच जीवाभावाच्या मित्राची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने ठाणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. खर्डी गावाजवळील निर्जन परिसरात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्यानंतर या भीषण हत्येचा पर्दाफाश झाला. मृताची ओळख अमन मुस्कीन शेख अशी पटली असून, हत्या केल्यानंतर ओळख लपवण्यासाठी आरोपींनी त्याचे शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करून जंगलात फेकून दिले होते.

या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने फैज सुलतान मलिक आणि अल्बान सुलतान मलिक या दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. तपासात असे निष्पन्न झाले आहे की, मार्च महिन्यात मुंब्र्यातील खर्डी परिसरामध्ये आरोपी आणि अमन यांच्यात बाचाबाची झाली होती. ‘तू मोठा की मी मोठा’ यावरून सुरू झालेला हा वाद इतका विकोपाला गेला की, फैज मलिकने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने अमनच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपींनी या संपूर्ण क्रूर कृत्याचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केले होते. पोलिसांनी तो मोबाईल जप्त केला असून फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. मुख्य आरोपी फैज मलिक याच्यावर यापूर्वीही खुन आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर मृत अमन शेखवरही चोरीचे गुन्हे नोंद होते. सध्या पोलीस मृताचे शीर आणि हत्येत वापरलेले शस्त्र शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. मुंब्रा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Total Visitors :
4576817
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *