वहाळ प्रभाग समिती सभेत ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; जि.प. सदस्या शिवानी सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिले कामकाजात गती आणण्याचे स्पष्ट निर्देश

Gramin Varta
202 Views

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील वहाळ जिल्हा परिषद गटात आयोजित करण्यात आलेली प्रभाग समितीची सभा लोकसहभाग आणि प्रशासकीय धडाक्यामुळे जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली आहे. प्रभाग समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद व स्थायी समिती सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आणि महसुलासह विविध शासकीय योजनांमधील समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सभेला ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपल्या समस्या थेट अधिकाऱ्यांसमोर मांडल्या, ज्यावर प्रशासनानेही सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सभेदरम्यान मार्गदर्शन करताना जि.प. सदस्या शिवानी सावंत यांनी प्रशासनाला सज्जड दम भरत स्पष्ट निर्देश दिले की, आज सभेत मांडण्यात आलेला नागरिकांचा एकही प्रश्न पुढील प्रभाग समिती सभेपूर्वी प्रलंबित राहता कामा नये. ज्या विषयांचा संबंध इतर विभागांशी आहे, त्यांच्याशी तातडीने समन्वय साधून प्रश्न मार्गी लावावेत आणि नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची वेळ येऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.

शासकीय प्रक्रियांचा आधार घेऊन कामात अनावश्यक दिरंगाई करणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. या सभेत वहाळचे पंचायत समिती सदस्य संजय जावळे, निवळीच्या संजीवनी खापरे आणि मांडकीचे शरद शिगवण यांच्यासह सरपंच, ग्रामसेवक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात झालेल्या थेट संवादामुळे ही सभा विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरली आहे.

Total Visitors :
4575741
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *