नाशिकच्या बाजारपेठेत कोथिंबीर दराचा उच्चांक; एका जुडीसाठी मोजावे लागले तब्बल २८५ रुपये

Gramin Varta
78 Views

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच कोथिंबिरीच्या भावाने विक्रमी उच्चांक गाठला असून, शुक्रवारी झालेल्या लिलावात कोथिंबिरीची एक जुडी तब्बल २८५ रुपयांना विकली गेली आहे. पावसाने दिलेल्या ओढीमुळे आणि शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीमुळे बाजारातील पालेभाज्यांची आवक प्रचंड घटली असून, परिणामी सर्वसामान्यांच्या ताटातून कोथिंबीर हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाने अनिश्चितता दाखवली आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात काहीसा पाऊस झाला. आतापर्यंत जिल्ह्यात ३५६.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली, तरी पावसाच्या लहरीपणामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या उत्पादनावर झाला असून, आवक कमालीची घटली आहे. बाजारातील तुटवड्यामुळे कोथिंबिरीचे दर गेल्या चार दिवसांपासून सातत्याने वाढत आहेत. १४ जुलै रोजी २०० रुपये आणि १५ जुलै रोजी २४८ रुपयांवर पोहोचलेला कोथिंबिरीचा दर शुक्रवारी २८५ रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचला. बाजार समितीच्या इतिहासातील हा सर्वाधिक दर असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

कोथिंबिरीचे भाव ७० रुपयांपासून ते थेट २८५ रुपयांपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ऐन महागाईच्या काळात कोथिंबिरीसाठी एवढी मोठी रक्कम मोजावी लागत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. पावसामुळे आवक सुरळीत होत नाही तोपर्यंत हे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. एकूणच, नाशवंत मालाच्या वाढत्या दरामुळे आता सामान्य नागरिकांच्या जेवणाच्या ताटातून कोथिंबीर गायब झाली असून, महागाईचा मोठा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.

Total Visitors :
4828037
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *