चिपळूण: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून जप्त केलेल्या मिळकतीत बेकायदेशीर प्रवेश; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
201 Views

चिपळूण : न्यायालयीन व प्रशासकीय आदेशानुसार ताब्यात घेण्यात आलेल्या मालमत्तेवरील सील तोडून बेकायदेशीररित्या प्रवेश करून तेथे वास्तव्यास राहिल्याप्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पेठमाप येथील गणेशवाडी परिसरात १३ जुलै ते १७ जुलै २०२६ या कालावधीत उघडकीस आली.

याप्रकरणी वरदायनी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई येथील विशेष वसुली व विक्री अधिकारी सागर सुभाष कदम (वय ३२, रा. पेढे-घरवेवाडी, ता. चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार श्रीमती गौरी देवषी गवळी (वय ६५), संतोष देवषी गवळी (वय ४८), रवि देवषी गवळी (वय ४२) आणि राजू देवषी गवळी (वय ५१, सर्व रा. पेठमाप गणेशवाडी, ता. चिपळूण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मालमत्ता कर्ज वसुली प्रक्रियेदरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांच्या आदेशानुसार ताब्यात घेण्यात आली होती. त्या ठिकाणी वरदायनी सहकारी पतसंस्थेने अधिकृत सील व शिक्के लावले होते. मात्र १३ जुलै रोजी फिर्यादी यांनी सदर मालमत्तेला भेट दिली असता संबंधितांनी ते सील व शिक्के तोडून बेकायदेशीररित्या मालमत्तेत प्रवेश करून तेथे वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले. यामुळे शासकीय आदेशाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी चिपळूण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम ३२९, २२३ व ३(५) तसेच संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा क्रमांक २१२/२०२६ दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :
4827810
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *