भारतीय नौदलाच्या ताफ्यात स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘मालवण’ दाखल

Gramin Varta
39 Views

नौदलाची सागरी सुरक्षा आणि पाणबुडीविरोधी क्षमता होणार आणखी बळकट

नवी दिल्ली: भारतीय नौदलाने कर्नाटकातील कारवार नौदल तळावर ‘आयएनएस मालवण’चा आपल्या ताफ्यात समावेश केला आहे.माहे श्रेणीतील ही दुसरी पाणबुडीविरोधी युद्धनौका कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर करून ‘आत्मनिर्भर भारत’ अंतर्गत तयार करण्यात आली आहे. यामुळे नौदलाची सागरी सुरक्षा आणि पाणबुडीविरोधी क्षमता आणखी बळकट होणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत युद्धनौका निर्मितीमध्ये देशाची वाढती क्षमता दर्शवणारे हे महत्त्वाचे उदाहरण आहे.

ही युद्धनौका विशेषतः उथळ किनारी भागांमध्ये शत्रूच्या पाणबुडया, अंडरवॉटर ड्रोन आणि सागरी घुसखोरांचा शोध घेऊन त्यांचा नायनाट करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. या युद्धनौकेत अत्याधुनिक सोनार प्रणाली, लाइटवेट टॉर्पेडो आणि पाणबुडीविरोधी रॉकेट लाँचर बसविण्यात आले आहेत. सुमारे ८० मीटर लांबी आणि ११०० टन विस्थापन क्षमता असलेली ही युद्धनौका वॉटर-जेट प्रोपल्शन प्रणालीने सुसज्ज असून, उथळ पाण्यातही तिला उच्च गतिशीलता आणि सुमारे २५ नॉट्स (४६ किमी/तास) इतका कमाल वेग प्राप्त होतो. या युद्धनौकेला महाराष्ट्रातील ऐतिहासिक किनारी शहर ‘मालवण’चे नाव देण्यात आले असून, तिच्या प्रतीकचिन्हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने ‘वाघ नख’ (वाघाच्या पंज्याचे नख) समाविष्ट करण्यात आले आहे.

भारतीय नौदलाच्या ताकदीला नवी धार देणारी आयएनएस मालवण ही तिच्या ८० टक्के स्वदेशी तंत्रज्ञान, अत्याधुनिक वॉटर-जेट प्रणोदन प्रणाली आणि घातक टॉर्पेडो क्षमतेमुळे चर्चेत आहे. समुद्रात शत्रूंवर नजर ठेवणे आणि अचूक हल्ला करण्यास सक्षम असलेली ही युद्धनौका भारतीय संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेचे मोठे उदाहरण मानली जात आहे. तिच्या मारक क्षमतेमुळे तिला समुद्रातील ‘सायलेंट किलर’ असेही म्हटले जात आहे. माहे श्रेणीतील या युद्धनौका किनारी आणि उथळ सागरी भागांमध्ये प्रभावी कार्यवाहीसाठी तयार करण्यात आल्या आहेत. ही अत्याधुनिक युद्धनौका उथळ सागरी भागांमध्ये शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणे, त्यांचा पाठलाग करणे आणि आवश्यकतेनुसार त्यांचा नायनाट करण्यासाठी विशेषतः तयार करण्यात आली आहे.

या समारंभाला हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पश्चिमी नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय वात्सायन, कोचीन शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी, नौदलातील वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Total Visitors :
4575764
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *