1 सप्टेंबरपासून खिशावर परिणाम! LPG, दूध, ITRसह महत्त्वाचे नियम बदलणार; जाणून घ्या काय स्वस्त-महाग होणार

Gramin Varta
508 Views

नवी दिल्ली : नवीन महिन्याची सुरुवात होताच विविध आर्थिक नियमांमध्ये बदल होण्याची शक्यता असते. 1 सप्टेंबर 2026 पासून लागू होणाऱ्या काही महत्त्वाच्या बदलांचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होऊ शकतो. यामध्ये LPG सिलिंडरची e-KYC, ITR दाखल करण्याची मुदत, मुंबईतील दुधाचे दर, आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी बोर्डिंग पासची प्रक्रिया तसेच पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा आढावा यांचा समावेश आहे.

LPG सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी e-KYC बाबत 31 ऑगस्ट ही महत्त्वाची तारीख होती. ज्या ग्राहकांनी आवश्यक e-KYC पूर्ण केलेली नसेल, त्यांना 1 सप्टेंबरपासून गॅस सिलिंडर मिळवताना अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे LPG ग्राहकांनी आपली e-KYC पूर्ण झाली आहे की नाही, हे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅस मार्केटिंग कंपन्यांकडून LPG चे नवे दर जाहीर केले जातात. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून LPG सिलिंडर स्वस्त होणार की महागणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

आयकर रिटर्न भरणाऱ्या करदात्यांसाठीही 31 ऑगस्ट ही महत्त्वाची अंतिम तारीख होती. व्यवसाय किंवा प्रोफेशनमधून उत्पन्न मिळणाऱ्या आणि ज्यांच्या खात्यांचे टॅक्स ऑडिट करणे आवश्यक नाही, अशा करदात्यांसाठी असेसमेंट वर्ष 2026-27 चा ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 होती. ही मुदत प्रामुख्याने ITR-3 आणि ITR-4 शी संबंधित आहे.

दरम्यान, मुंबईकरांच्या खिशावरही 1 सप्टेंबरपासून परिणाम होणार आहे. मुंबईमध्ये डेअरी फार्ममधून पुरवठा होणाऱ्या ताज्या म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात वाढ करण्यात आली आहे. मुंबई मिल्क प्रोड्यूसर्स असोसिएशनने दुधाच्या घाऊक दरात प्रति लिटर 9 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे दुधाचा घाऊक दर 93 रुपयांवरून थेट 102 रुपये प्रति लिटर होणार आहे.

भारतामधून आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी बोर्डिंग पासशी संबंधित प्रक्रियेतही बदल होणार आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून इमिग्रेशन काउंटरवर बोर्डिंग पासवर स्टॅम्प घेण्याची आवश्यकता राहणार नाही. प्रवाशांना मोबाइलमध्ये असलेला इलेक्ट्रॉनिक बोर्डिंग पास दाखवता येणार आहे. डिजिटल बोर्डिंग पास वापरायचा नसल्यास प्रवाशांना प्रिंटेड बोर्डिंग पासचा वापरही करता येणार आहे.

याशिवाय दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांकडून LPG सोबत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचाही आढावा घेतला जातो. त्यामुळे 1 सप्टेंबरपासून पेट्रोल, डिझेल किंवा LPG सिलिंडरच्या किमतींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या महिन्याच्या सुरुवातीला या दरांमध्ये नेमका काय बदल होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Total Visitors :
4786256
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *