नीट पेपरफुट प्रकरण : राहुल गांधींसह इंडि आघाडीचा गांधी स्मृती येथे मोर्चा

Gramin Varta
63 Views

महात्मा गांधींना अभिवादन करत आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली

दिल्ली: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी इंडि आघाडीच्या प्रमुख नेत्यांसह गांधी स्मृती येथे जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केले.यावेळी त्यांनी नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करत विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली.

राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह इंडि आघाडीतील अनेक खासदार आणि नेते एका बसमधून गांधी स्मृती येथे पोहोचले. त्यांच्या ताफ्यासोबत काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. बिहारचे खासदार पप्पू यादव हे बसच्या पुढे पायी चालत सहभागी झाले होते. तसेच केरळचे मुख्यमंत्रीही आपल्या ताफ्यासह कार्यक्रमात सहभागी झाले.

मात्र, गांधी स्मृतीकडे रवाना होण्यापूर्वी राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर विरोधी पक्षाच्या बसला काही काळ रोखण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने बसला पुढे जाण्याची परवानगी दिली.

विद्यार्थ्यांसाठी भावनिक संदेश

गांधी स्मृतीला रवाना होण्यापूर्वी राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर विद्यार्थ्यांना उद्देशून संदेश प्रसिद्ध केला. राहुल म्हणाले की, आम्ही गांधी स्मृती येथे शांततापूर्ण पद्धतीने जात आहोत. नीट पेपरफुटीमुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हा प्रवास आहे. भारतातील विद्यार्थी एकटे नाहीत. संपूर्ण विरोधी पक्ष त्यांच्या न्याय्य मागण्यांसोबत ठामपणे उभा आहे.

काँग्रेसचा केंद्र सरकारवर निशाणा

काँग्रेसनेही सोशल मीडियावर निवेदन जारी करत विद्यार्थ्यांवरील अन्यायाचा निषेध केला. पक्षाने म्हटले की, देशातील विद्यार्थी आंदोलन करत असताना विरोधी पक्षानेही त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले पाहिजे. आम्हाला इंडिया गेट येथे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यानंतर गांधी स्मृतीकडे जात असतानाही आमच्या बसला अडवण्यात आले. विद्यार्थ्यांना आम्ही विश्वास देतो की, त्यांच्या न्यायाच्या लढ्यात संपूर्ण विरोधक त्यांच्या पाठीशी आहे.नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण असून, या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे.

Total Visitors :
4580960
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *