सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी आंबाघाट मार्ग बंद; एसटीच्या फेऱ्या अनुस्कुरा मार्गे वळवल्या

Gramin Varta
657 Views

रत्नागिरी : रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणारा महत्त्वाचा आंबाघाट मार्ग दरड कोसळल्यामुळे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरड कोसळल्याने मार्गावर वाहतुकीला धोका निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी यांनी पुढील आदेश येईपर्यंत या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या निर्णयामुळे आंबाघाट मार्गे रत्नागिरीहून कोल्हापूर तसेच कोल्हापूरहून रत्नागिरीकडे ये-जा करणाऱ्या वाहनांना आता पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. विशेषतः एसटी बसच्या वाहतुकीवरही याचा परिणाम झाला असून, प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आंबाघाट मार्गे धावणाऱ्या एसटीच्या सर्व फेऱ्या पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.

आता रत्नागिरी–कोल्हापूर मार्गावरील एसटी बस लांजा, वाटूळ, ओणी, पाचल, अनुस्कूरा, मलकापूर मार्गे कोल्हापूर अशी धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आंबाघाट मार्ग बंद असल्याची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरड कोसळलेल्या ठिकाणी मार्गाची परिस्थिती आणि सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत प्रवाशांनी बंद असलेल्या आंबाघाट मार्गावरून प्रवास करण्याचा प्रयत्न करू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Total Visitors :
4680972
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *