तुकाराम मुंढेंच्या FDA चा डॉमिनोज पिझ्झाला दणका; मुंबईसह राज्यातील ४ शाखांचे परवाने निलंबित

Gramin Varta
133 Views

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या कारवाया सुरू आहेत. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठ्या कारवाया करण्यात येत आहेत.

भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त मिठाई, रेस्टॉरंट्स, हॉटेलवरील निकृष्ट जेवण, भेसळयुक्त पनीर अशा अनेक कारवाया एफडीएकडून करण्यात आल्या आहेत.

आता तुकाराम मुंढे यांच्या एफडीए विभागाने डॉमिनोज पिझ्झाला मोठा दणका दिला आहे. स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबतच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर ‘डोमिनोज पिझ्झा’च्या चार शाखांचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.

राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभरात राबवलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचं अनेकदा उल्लंघन झाल्याचं आढळून आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करण्यात आलेल्या डॉमिनोज पिझ्झाच्या चार शाखांपैकी तीन शाखा मुंबईतील आहेत, तर चौथी शाखा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

वृत्तानुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाने राज्यभर राबवलेल्या मोहिमेचा भाग म्हणून ११ ऑगस्ट रोजी अनेक ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये एफडीएने डोमिनोज पिझ्झा, केएफसी, पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड्स, सबवे, बर्गर किंग, स्टारबक्स आणि मॉन्जिनीज (Monginis) यांसारख्या ब्रँड्सच्या एकूण १०४ आस्थापनांची तपासणी केली होती. या मोहिमेदरम्यान दोन आस्थापनांचं कामकाज त्वरित थांबवण्यात आलं आहे, तसेच ९५ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत आणि पाच अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत, असं वृत्तात म्हटलं आहे.

एफडीएकडून कुठे कारवाई?

दरम्यान, बोरीवली पश्चिम येथील डोमिनोज पिझ्झाच्या एका शाखेमध्येही नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं. अन्न साठवणूक, तापमान, अन्नाची तपासणी, स्वच्छता यासह आदी त्रुटी एफडीएने निदर्शनास आणून दिल्या. तसेच घाटकोपर पश्चिम येथील एका मॉलमधील ‘डोमिनोज’च्या एका शाखेचा परवानाही निलंबित करण्यात आला. एफडीएच्या मते या आस्थापनेमध्ये स्वच्छता नव्हती आणि नियमांचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं होतं. दुसरीकडे, सातारा जिल्ह्यातील देखील ‘डोमिनोज’च्या एका शाखेचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.

Total Visitors :
4696660
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *