रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्या, संरक्षण भिंत आणि शाळा सुशोभीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने खनिकर्म विभागाकडे निधीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधील ९७ शाळांसाठी एकूण ६ कोटी ३२ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार या निधीतून शाळांच्या छताची गळती, पत्रे, फरशी, शौचालयांची दुरुस्ती तसेच नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. अनेक शाळांच्या इमारती जुन्या झाल्याने पावसाळ्यात गळतीचा त्रास होत आहे. काही शाळांमध्ये वर्गखोल्यांची कमतरता असून, विद्यार्थ्यांना सुरक्षित व सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.
एकूण २२ शाळांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ३९ लाख रुपयांची मागणी करण्यात आली असून, यामध्ये १५ शाळांच्या दुरुस्तीसाठी ९३ लाख ५० हजार रुपये आणि सात नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी ४५ लाख ५० हजार रुपयांचा समावेश आहे.
तालुकानिहाय प्रस्तावामध्ये रत्नागिरी तालुक्यातील १७ शाळांसाठी १ कोटी २३ लाख रुपये, संगमेश्वर तालुक्यातील १५ शाळांसाठी १ कोटी २ लाख रुपये, दापोलीतील ११ शाळांसाठी ६६ लाख रुपये, राजापूर तालुक्यातील १० शाळांसाठी ७६ लाख रुपये आणि लांजा तालुक्यातील ११ शाळांसाठी ६३ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
मंडणगड तालुक्यातील चार शाळांसाठी २३ लाख रुपये, गुहागर तालुक्यातील चार शाळांसाठी २४ लाख रुपये आणि खेड तालुक्यातील तीन शाळांसाठी १६ लाख रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अनेक शाळांच्या इमारती जुन्या झाल्याने पावसाळ्यात गळतीसह विविध समस्या निर्माण होतात. काही ठिकाणी वर्गखोल्या अपुऱ्या असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे खनिकर्म विभागाने प्रस्तावाला मंजुरी दिल्यास जिल्ह्यातील शाळांच्या दुरुस्तीबरोबरच नवीन वर्गखोल्यांची उभारणी होऊन विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित आणि चांगले शैक्षणिक वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
शाळा दुरुस्तीसाठी खनिकर्मकडे ६ कोटी ३२ लाखांचा निधी प्रस्तावित
Leave a Comment





