एआय महासत्ता बनण्यासाठी मजबूत परिसंस्थेची गरज; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन, २,८०० किमी फ्रेट कॉरिडॉरचे काम पूर्ण

Gramin Varta
25 Views

विशेष प्रतिनिधी / वडोदरा : भारताला कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रात जागतिक महासत्ता बनवायचे असल्यास देशात सक्षम आणि भक्कम पायाभूत सुविधांसह मजबूत एआय परिसंस्था उभारणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. एआयमधील कुशल मनुष्यबळाची गरज केवळ माहिती तंत्रज्ञानापुरती नसून शेती, आरोग्य, उत्पादन आणि रोबोटिक्स यांसारख्या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात रोजगार आणि नवे उपाय निर्माण करणारी आहे, असे सांगत त्यांनी तरुणांना या नव्या तंत्रज्ञानासाठी सज्ज करण्यासाठी सरकार व्यापक मोहीम राबवत असल्याचे स्पष्ट केले. बदलत्या काळानुसार पदवीपेक्षा कौशल्य आत्मसात करण्यावर भर देण्याचे आवाहन करत गरिबांवरील शिक्षणाचा भार कमी करण्यासाठी मोफत ऑनलाइन कोचिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वडोदरा येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी देशातील २,८०० किलोमीटरहून अधिक लांबीच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्याची घोषणा केली. २००६ मध्ये स्थापन झालेला हा प्रकल्प २०१४ पर्यंत केवळ फायलींमध्ये अडकून राहिला होता, अशी टीका करत त्यांनी मागील सरकारला उपरोधिक टोला लगावला. सध्या पूर्व आणि पश्चिम कॉरिडॉरवर दररोज ४३० हून अधिक मालगाड्या धावत असून मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च निम्म्याहून अधिक कमी झाला आहे. जेएनपीटी ते वडोदरा धावलेल्या एका डबल-स्टॅक कंटेनर मालगाडीने २५० हून अधिक ट्रकचा भार एकट्याने वाहून नेल्याचे सांगत त्यांनी यातून मालवाहतुकीची कार्यक्षमता सिद्ध झाल्याचे स्पष्ट केले. या कॉरिडॉरमुळे महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील रेल्वेपासून वंचित राहिलेले आदिवासी भाग मुख्य प्रवाहात जोडले गेले आहेत.

रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भाष्य करताना पंतप्रधानांनी यंदाचा रेल्वे अर्थसंकल्प २.७५ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सांगितले. २०१४ पासून ५० हजार आधुनिक रेल्वे डब्यांची निर्मिती झाली असून यामुळे हजारो रोजगार निर्माण झाले आहेत. याशिवाय भारत आता केवळ अंतिम उत्पादन नव्हे, तर ‘चिप्सपासून जहाजांपर्यंत’ संपूर्ण पुरवठा साखळी देशात विकसित करत आहे. सौरऊर्जा क्षेत्रात २०० गिगावॅट क्षमतेचे फोटोव्होल्टेइक मॉड्यूल्स देशात तयार होत असून ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजने’अंतर्गत देशभरातील ५५ लाख तर गुजरातमधील ११ लाख घरांवर सौर पॅनेल्स बसवून नागरिक वीज उत्पादक बनले आहेत.

भविष्यातील डेटा सेंटर्स, चिप उद्योग आणि एआयसाठी वीज ही जीवनरेखा असल्याचे स्पष्ट करत सरकार सौर, पवन, जलविद्युत आणि अणुऊर्जेवर वेगाने काम करत असल्याचे मोदी म्हणाले. यासाठी आवश्यक असणाऱ्या युरेनियम आणि दुर्मिळ खनिजांच्या पुरवठ्यासाठी विविध देशांशी करार करण्यात आले आहेत. देशातील पहिले ‘मेड इन इंडिया’ लष्करी वाहतूक विमान सी-२९५ चे पहिले उड्डाण वडोदरा येथून झाल्याचा गौरव करत त्यांनी विरोधकांच्या अपप्रचारावरही टीका केली. खोट्याच्या कोलाहलाने दिशाभूल करणारे अनेक असले तरी देशाची तरुण पिढी सत्याच्या गर्जनेसह विकासाच्या मार्गावर पुढे जात असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

- Advertisement -
Total Visitors :
4825606
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *