खेरशेतमध्ये चिमुकल्यांच्या कलागुणांना मिळाले हक्काचे व्यासपीठ

Gramin Varta
8 Views

‘इटुकली पिटुकली स्पर्धा २०२६’ उत्साहात संपन्न; जि.प. सदस्या पूजा निकम यांची प्रमुख उपस्थिती

सावर्डे/सचिन साडविलकर : चिपळूण तालुक्यातील खेरशेत येथे चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देतानाच त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारी ‘इटुकली पिटुकली स्पर्धा २०२६’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. श्री सुकाई शिरकाई संस्था, कुटरे आणि राजेशिर्के परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने भागीरथीबाई राजेशिर्के सभागृह (विसावा मंगल कार्यालय), खेरशेत येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्या पूजा शेखर निकम यांच्या प्रमुख उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

बालकांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सृजनशीलतेला चालना मिळावी आणि लहान वयातच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला चिमुकल्यांसह पालकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटांतील बालकांनी विविध मनोरंजक स्पर्धांमध्ये उत्साहाने सहभाग घेत आपल्या कला-कौशल्याचे दर्शन घडविले.

चिमुकल्यांच्या सादरीकरणाने सभागृहात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. बालकांचा निरागसपणा, उत्स्फूर्त सहभाग आणि आत्मविश्वास पाहून उपस्थित पालक, ग्रामस्थ व मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना प्रोत्साहन दिले.

यावेळी बालकांशी संवाद साधताना पूजा निकम यांनी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. बालपणातील कला, सृजनशीलता आणि आत्मविश्वासाला योग्य दिशा देण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वपूर्ण ठरतात. ‘इटुकली पिटुकली’ ही संकल्पना अत्यंत नाविन्यपूर्ण असून चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच या उपक्रमाच्या यशाची खरी पावती आहे. भविष्यातही अशा उपक्रमांना आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

स्पर्धेतील विजेत्या बालकांना विविध क्रमांकांनुसार पारितोषिके, ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सहभागी झालेल्या प्रत्येक बालकाचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. त्यामुळे स्पर्धेतील सहभाग हा केवळ विजयापुरता मर्यादित न राहता प्रत्येक चिमुकल्यासाठी आनंदाचा आणि आत्मविश्वास वाढविणारा अनुभव ठरला.

बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम केवळ स्पर्धा न राहता त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आनंदसोहळा ठरला. भविष्यातही अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा उपस्थित पालक व ग्रामस्थांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाला सौ. स्मिता राजेशिर्के, सुनीता राजेशिर्के, स्मिता दळवी, प्रकाश राजेशिर्के, सई सुर्वे, राजेंद्र मते, सागर राजेशिर्के, श्री. घडशी यांच्यासह मान्यवर, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आयोजक व उपस्थितांच्या सहकार्यामुळे ‘इटुकली पिटुकली स्पर्धा २०२६’ उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडली.

Total Visitors :
4826238
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *