दापोलीत दोन ‘पॉक्सो’ गुन्ह्यांची नोंद; अवघ्या अडीच महिन्यांत ६ पॉक्सो गुन्हे दाखल झाल्याने खळबळ

Gramin Varta
120 Views

दापोली : तालुक्यात अल्पवयीन मुलींशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या प्रकरणांत दापोली पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवघ्या अडीच महिन्यांत ६ पॉक्सो गुन्हे दाखल झाल्याने आणि आरोपी जामिनावर सुटत असल्याने दापोलीतील बालिका, युवती व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

दापोली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी (वय १६ वर्षे ११ महिने २५ दिवस) ओळख वाढवून, ती अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही फेब्रुवारी २०२६ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी अदनान लियाकत कोळथरकर (वय ४०) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेचे कलम ६४(१), (२) आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाच्या (पॉक्सो) कलम ४, ६, ८ नुसार हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास उपनिरीक्षक ज्योती चव्हाण करत आहेत.

दुसऱ्या घटनेत, ८ वर्षे ४ महिने वयाच्या बालिकेशी संबंधित प्रकार घडला आहे. १ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडित मुलगी घरी एकटीच बेडवर अभ्यास करत असताना, संशयित प्रमोद भिकू लोवरे याने तेथे येऊन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. या प्रकरणी नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५(२) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक पूजा हिरेमठ या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे दापोलीतील पालकवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, सर्व आरोपींवर कठोर कारवाई करून कायद्याचा धाक निर्माण करावा, अशी तीव्र मागणी नागरिकांमधून होत आहे.

Total Visitors :
4837780
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *