दापोली : तालुक्यातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून ६४ व ८५ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये अज्ञात इसमांनी महिलांना अज्ञात कारणावरून पळवून नेल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली असून, दापोली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पहिली घटना सडवे गणेशवाडी, पोलीस ठाणे कोळबांद्रे, ता. दापोली येथे ११ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची नोंद आहे. या प्रकरणी हरिश्चंद्र भागोजी कावणकर (वय ६२) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची नातेवाईक गंगाबाई गुणाजी कावणकर (वय ८५) या बेपत्ता असून, त्यांना अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून पळवून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी १२ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसरी घटना फरारे, ता. दापोली येथे ११ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ४.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी प्रविण महादेव चव्हाण (वय ३३, रा. पांगारी तर्फे गोविंदशेतवाडी, ता. दापोली) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांची आई द्रौपदी महादेव चव्हाण (वय ६४) यांना अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला.
एकाच तालुक्यात अल्पावधीत दोन वृद्ध महिला बेपत्ता झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे. दोन्ही घटनांमागील नेमके कारण काय, महिला कुठे आहेत आणि त्यांना कोणी पळवून नेले, याचा तपास दापोली पोलीस करीत आहेत.
ब्रेकिंग : दापोलीतून दोन वृद्ध महिला बेपत्ता; अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल
Leave a Comment





