ब्रेकिंग: बावनदी ब्रिजवर कारने दुचाकीस्वाराला उडवले; वेळवंड येथील तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
1470 Views

रत्नागिरी / समीर शिगवण: मुंबई-गोवा महामार्गावर बावनदी येथे भरधाव शेवरलेट एन्जॉय कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने २४ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण अपघातामुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तेजस विनायक पांचाळ (२४, रा. वेळवंड, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तेजस हा बावनदी येथील पुलावरून वळण घेत असताना मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या शेवरलेट एन्जॉय कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी भीषण होती की, तेजस दुचाकीवरून उडून रस्त्यालगत असलेल्या दगडावर आदळला. गंभीर दुखापत झाल्याने तो रक्तबंबाळ अवस्थेत घटनास्थळी पडला होता.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने जखमी तेजसला उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले. मात्र, डोक्याला झालेली गंभीर दुखापत त्याच्या जीवावर बेतली. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेने वेळवंड परिसरावर शोककळा पसरली असून, मुंबई-गोवा महामार्गावरील धोकादायक वळणे आणि भरधाव वाहनांचा प्रश्न पुन्हा अधोरेखित झाला आहे.

Total Visitors :
4849231
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *