रत्नागिरी: शहरात अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांविरोधात शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने जोरदार मोहीम उघडत एका संशयिताला रंगेहात ताब्यात घेतले आहे. शहर परिसरात गस्त घालत असताना पथकाने निवखोल येथील रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक १७ च्या बांधकाम सुरू असलेल्या संशयास्पद जागेवर अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी संबंधित इसमाच्या ताब्यातून २.५ ग्रॅम वजनाचे घातक ब्राऊन हेरॉईन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोठी तस्करी उधळून लावली.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, मुस्तकीम युसुफ मुल्ला (वय ३५, रा. राजिवडा, रत्नागिरी) हा इसम स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी आणि छुप्या विक्रीच्या उद्देशाने हे ब्राऊन हेरॉईन बाळगून फिरत असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेऊन त्याच्याकडील अमली पदार्थांसह एमएच ०८ एएम ३२१२ क्रमांकाची दुचाकी जप्त केली. या गंभीर प्रकाराबाबत संशयित आरोपीविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये (एनडीपीएस ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचे अन्य कोणाशी लागेबांधे आहेत का याचा कसून तपास पोलीस करत आहेत.
सदर धडक कामगिरी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अभिजीत थोरात आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक दीपक साळवी, पोलीस हवालदार भालचंद्र मयेकर, शांताराम झोरे, दिनेश आखाडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल अमित पालवे आणि निलेश शिंगवे यांनी यशस्वीपणे पार पाडली. शहरात अमली पदार्थांचे जाळे पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून अशा गैरप्रकारांवर यापुढेही कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा सज्जड इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.





