गणपतीपुळे/वैभव पवार: रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथील स्वयंभू श्री गणपती मंदिरात भाद्रपदी गणेशोत्सवाला (शके १९४८) भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवार, १३ सप्टेंबर रोजी श्री गणरायाच्या चरणी सहस्र (१ हजार) मोदक समर्पण विधी भक्तिभावाने पार पडला.
संस्थान श्री देव गणपतीपुळे पंचकमिटीच्या वतीने विश्वस्त तथा सचिव विनायक तुकाराम राऊत यांनी पत्नीसमवेत श्रींची विधिवत पूजा केली. यावेळी श्री गणरायाला सहस्र मोदकांचे समर्पण करण्यात आले. मुख्य पुजारी डॉ. चैतन्य वासंती वामन घनवटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहस्रनाम पठण करण्यात आले.
या धार्मिक विधीस मुख्य पुजारी अनय घनवटकर, ओंकार घनवटकर, अभिजीत घनवटकर यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. पूजा, मंत्रोच्चार आणि नामजपाने मंदिर परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
भाद्रपदी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव काळात हे कार्यक्रम सुरळीतपणे पार पडावेत यासाठी पंचकमिटीचे विश्वस्त तसेच कर्मचारी परिश्रम घेत आहेत.





