अविनाश काळे यांच्या ‘नवनिर्मितीचा आनंद’ उपक्रमातून गोळपमधील शाळांत फुलणार परसबागा

Gramin Varta
60 Views

गोळप: मातीत हात घालून निसर्गाशी नाते जोडतानाच स्वतः पिकवलेल्या भाजीपाल्याचा आनंद घेता यावा, या उदात्त हेतूने अविनाश काळे यांच्या संकल्पनेतून गोळप ग्रामपंचायत क्षेत्रातील आठ शाळांमधील १८० विद्यार्थ्यांना भाजीपाल्याच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे. ‘नवनिर्मितीचा आनंद’ या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबतच शेती आणि पर्यावरणाची आवड निर्माण होणार आहे.

शहरातील मुलांपासून माती दुरावत असताना, ग्रामीण भागातील मुलांना मातीचे महत्त्व कळावे आणि त्यांनी स्वकष्टाने काहीतरी निर्माण करावे, या उद्देशाने काळे यांनी पुढाकार घेतला आहे. गोळप ग्रामपंचायत क्षेत्रातील सर्व शाळांना भेट देऊन भेंडी, चवळी, वाटाणा, मुळा, पालक, दोडका आणि दुधी भोपळा अशा सात प्रकारच्या भाजीपाल्यांची बियाणी विद्यार्थ्यांना देण्यात आली. केवळ बियाणे न वाटता विद्यार्थ्यांना त्यांची ओळख करून देत, ती पेरण्याची आणि वाढवण्याची योग्य पद्धतही काळे यांनी समजावून सांगितली. या उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षकांनाही परसबाग फुलवण्यासाठी बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे शाळेत कार्यानुभव उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली. पालकांच्या मदतीने या बियांची लागवड करून त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला आहे. येत्या दोन महिन्यांत कोणत्या विद्यार्थ्याने कोणती भाजी यशस्वीपणे फुलवली, याचा आढावा स्वतः उपक्रमकर्ते अविनाश काळे घेणार आहेत. प्रत्येक मुलाने मेहनत घेऊन किमान काही वेली किंवा झाडे जगवली, तरी या उपक्रमाचे सार्थक होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे गोळप परिसरातील शाळांमध्ये आता हिरवीगार परसबाग बहरणार असून, विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाची जाणीव रुजत आहे.

- Advertisement -
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *