दापोलीत प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूची विक्री; पोलिसांनी जप्त केला २४ हजारांहून अधिकचा साठा

Gramin Varta
228 Views

दापोली: मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या आणि शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटख्याची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या एका व्यापाऱ्यावर दापोली पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी २४ हजार २०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा नारायण गवळी (वय ६०, रा. स्वामी व्हिला, पांढरेवाडी स्टॉप, दापोली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

ही कारवाई २८ जून रोजी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास दापोली-मंडणगड रस्त्यावरील आंबा पॉईंट येथील एका वडापाव विक्रीच्या दुकानासमोर करण्यात आली. आरोपी कृष्णा गवळी याने मानवी आरोग्यास अपायकारक आणि प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची साठवणूक केली असून तो त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या ठिकाणी झडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून प्रतिबंधित पान मसाला आणि सुगंधी तंबाखूची मोठी खेप मिळून आली.

यामध्ये २१ हजार ७८० रुपये किमतीचे ‘केसरयुक्त विमल पान मसाला’ असलेली १२१० पाऊच आणि २ हजार ४२० रुपये किमतीचा सुगंधी तंबाखूचा साठा अशा एकूण २४ हजार २०० रुपयांच्या मालाचा समावेश आहे. प्रतिबंधित पदार्थांमुळे समाजस्वास्थ्यावर आणि मानवी आरोग्यावर होणारे घातक परिणाम माहीत असतानाही, केवळ आर्थिक फायद्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करण्याच्या उद्देशाने आरोपीने हा साठा विक्रीसाठी बाळगला होता. दापोली पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल मधकर सोनबा चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, पोलिसांनी भारतीय दंड संहिता आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील विविध गंभीर कलमान्वये आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे दापोलीतील अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *