लांजा / अरबाज नेवारेकर: राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात पार पडला असला, तरी लांजा शहरात मात्र या कार्यक्रमाबाबत आरोग्य विभागाने स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे यांनी नगराध्यक्षाना पूर्वकल्पना न देता किंवा निमंत्रण न देता हा कार्यक्रम पार पाडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सरकारी योजनांची अंमलबजावणी करताना स्थानिक लोकप्रतिनिधींना सहभागी करून घेणे बंधनकारक असतानाही आरोग्य विभागाने नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप केला जात आहे.
याबाबत लांजा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौ. सावलीताई कुरूप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे यांनी या महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही, तसेच निमंत्रणही पाठवले नाही. ही बाब खेदजनक असून लोकप्रतिनिधींना डावलणारी ही कार्यपद्धती चुकीची असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाची तक्रार आपण आमदार किरण भैय्या सामंत यांच्याकडे करणार असून, भविष्यात लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील प्रत्येक सरकारी योजनेत लोकप्रतिनिधींचा सहभाग सुनिश्चित केला जाईल, असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.
या वादावर प्रतिक्रिया देताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांतकुमार परगे यांनी सांगितले की, साटवली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लांजा उपकेंद्राच्या स्तरावर स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रण देणे राहून गेले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. संबंधित प्रकरणाची सविस्तर चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात येईल आणि चौकशीअंती आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही केली जाईल. मात्र, आरोग्य विभागाच्या या कारभारामुळे प्रशासकीय नियोजनातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
