दापोलीच्या हर्णे किनाऱ्यावर आढळला मृत नर डॉल्फिन; वन विभागाकडून पर्यावरणपूरक विल्हेवाट

Gramin Varta
250 Views

दापोली : तालुक्यातील हर्णे बायपास समुद्रकिनाऱ्यावर शनिवारी सकाळी सुमारे एक ते दीड वर्षाचा एक नर डॉल्फिन मृतावस्थेत आढळून आला. ही घटना समजताच परिसरात मोठी खळबळ उडाली आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने वन विभागाला याची माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मृत डॉल्फिनचा पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत डॉल्फिनची तपासणी केल्यानंतर, नियमानुसार पर्यावरणपूरक पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

वन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा डॉल्फिन समुद्रात भरकटला असावा. भरकटल्यानंतर समुद्रातील खडकांवर आदळल्यामुळे त्याच्या मानेला आणि पोटाच्या भागाला गंभीर जखमा झाल्या आहेत आणि याच जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, मृत्यूचे नेमके कारण पशुवैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. ही कार्यवाही वनरक्षक प्रभू साबणे आणि विश्वंभर झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी हर्णे कांदळवन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फहद जमादार, कासवमित्र दुर्गेश जाधव, मुजम्मील काझी, सुरक्षारक्षक नदीम महाडिक, ग्रामपंचायत सदस्या सना काझी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, समुद्रकिनाऱ्यावर कोणताही जखमी किंवा मृत सागरी जीव आढळल्यास त्याला स्पर्श न करता तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

Total Visitors :
4562544
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *