रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील निसर्गसंपन्न विल्ये गावात केवळ ५०० ब्रास माती उपसण्याची परवानगी असताना सुमारे साडेपाच हजार ब्रास बॉक्साईटचे बेकायदा उत्खनन झाल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचा दावा करत संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहरापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावरील विल्ये गाव हे आंबा आणि काजू बागांसाठी ओळखले जाते. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, एका ठिकाणी केवळ ५०० ब्रास माती उपसण्याची अधिकृत परवानगी घेण्यात आली होती. मात्र, त्या परवानगीचा गैरवापर करून ‘मास्टर राजू’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या व्यक्तीने सुमारे साडेपाच हजार ब्रास बॉक्साईटचे उत्खनन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
उत्खनन करण्यात आलेले बॉक्साईट जयगड बंदरामार्गे परदेशात पाठवण्यात आल्याची चर्चा परिसरात असून, या व्यवहारामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
ग्रामस्थांनी सुरुवातीपासूनच या उत्खननाला विरोध केल्याचे सांगितले आहे. मात्र, संबंधित प्रशासकीय यंत्रणा आणि खनिकर्म विभागाने या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. परवानगीपेक्षा अनेक पटींनी अधिक उत्खनन झाले असल्याचा आरोप असताना संबंधितांवर कारवाई का झाली नाही, तसेच खनिकर्म विभागाने मौन का बाळगले आहे, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
विल्ये परिसरातील आंबा व काजू बागांवर या उत्खननाचा परिणाम होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. उत्खननामुळे निर्माण होणारी धूळ, प्रदूषण आणि पर्यावरणीय हानी यामुळे हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास परिसरातील पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, परवानगीपेक्षा अधिक झालेल्या उत्खननाबाबत शासन नियमानुसार दंडात्मक कारवाई करावी, महसुलाची वसुली करावी आणि नियमांचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
बंदरामार्गे परदेशात बॉक्साईट गेल्याची चर्चा; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
विल्ये गावातून उत्खनन करण्यात आलेले सुमारे साडेपाच हजार ब्रास बॉक्साईट जयगड बंदरामार्गे परदेशात पाठवण्यात आल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणातील खनिज बंदरापर्यंत कसे पोहोचले, संबंधित यंत्रणांनी याची नोंद घेतली होती का, तसेच या संपूर्ण व्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
‘मास्टर राजू’च्या करामती? विल्ये येथे ५०० ब्रासच्या परवानगी असताना साडेपाच हजार ब्रास बॉक्साईट उत्खनन; चौकशीची मागणी
Leave a Comment





