कोकणात सापडले पुरी संप्रदायाचे ऐतिहासिक अस्तित्व; अलिबाग जवळील ब्रिटिशकालीन शिलालेखातून मोठा उलगडा

Gramin Varta
124 Views

अलिबाग: कोकणाच्या लाल मातीत अनेक परंपरा रूजलेल्या असून, संशोधनाने त्यात आता पुरी संप्रदायाचे देखील दाखले मिळाले आहेत. पुरी संप्रदाय हा सध्या पूर्व किनारपट्टी, ओडिशा किंवा बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेला आहे हे आपल्याला माहित आहे, परंतु कोकणात प्रथमच पुरी संप्रदायाचे पुरावे मिळाले आहेत. रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळील कुसुंबळे येथील प्राचीन शिवमंदिराच्या जोत्यावर कोरलेला ब्रिटिशकालीन शिलालेख इतिहास संशोधनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. शके १८२० (इ.स. १८९८) मधील हा चार ओळींचा शिलालेख कोकण इतिहास परिषदेचे रायगड जिल्हाध्यक्ष महाड येथील प्रा. डॉ. अंजय धनावडे यांनी शोधून त्याचे वाचन केले आहे. या शिलालेखामुळे कोकणातील शैव परंपरा, मंदिर व्यवस्थापन आणि पुरी संप्रदायाच्या कार्याचा एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज प्रथमच प्रकाशात आला आहे.

ब्रिटिश राजवटीच्या काळात अलिबाग हे जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र होते आणि त्याकाळातील ग्रामीण भागातील धार्मिक संस्था, मठपरंपरा व मंदिर व्यवस्थापन नेमकं कसं होतं, याच्यावर भर टाकणारा हा दुर्मीळ अभिलेखीय पुरावा मानला जात आहे. शिलालेखातील मजकूरानुसार, “बुधपुरी, समशेरपुरी, शंकरपुरी व चिदापुरी यांची मंदिरे त्याकाळी होती. त्याचा जीर्णोद्धार नातू देऊपुरी, गुरु मंगळपुरी,” असा उल्लेख आढळतो. तसेच “गौरशिवचे पु. पांडू बामणा,” अशी नोंदही कोरलेली आहे. शेवटी “शके १८२०, विलंबी नाम संवत्सरे” अशी स्पष्ट कालनोंद असल्याने मंदिराचा जीर्णोद्धार इ.स. १८९८ मध्ये झाल्याचे सिद्ध होते. या शिलालेखाचा अन्वयार्थ मांडताना प्रा. डॉ. धनावडे यांनी सांगितले की, येथे उल्लेख झालेली बुधपुरी, समशेरपुरी, शंकरपुरी, चिदापुरी, देऊपुरी आणि मंगळपुरी ही नावे दशनामी गोसावी परंपरेतील पुरी शाखेशी संबंधित असल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हा शिलालेख केवळ मंदिराच्या जीर्णोद्धाराची नोंद नसून कोकणातील पुरी संप्रदायाचे अस्तित्व, त्यांची गुरु-शिष्य परंपरा आणि मंदिर व्यवस्थापनातील योगदान अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तऐवज ठरतो.

कोकणातील पुरी परंपरेचा इतिहास शिवकालापर्यंत मागे जात असल्याचे विविध ऐतिहासिक साधनांवरून दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात निश्चलपुरी यांचा उल्लेख इतिहासात आढळतो. त्यामुळे दशनामी संप्रदायातील पुरी परंपरेचे कोकणातील अस्तित्व किमान सतराव्या शतकापासून असल्याचे स्पष्ट होते. कुसुंबळे येथील शिलालेखातील पुरी साधूंचा आणि शिवकालीन निश्चलपुरी यांचा थेट संबंध असल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नसल्याचे प्रा. डॉ. धनावडे यांनी स्पष्ट केले, परंतु त्या संबंधांचा शोध घेण्याच्या दृष्टीने हा शिलालेख महत्त्वाचा ठरू शकतो. कोकणात शैव परंपरेच्या जतनात पुरी संप्रदायाचे मोठे योगदान राहिले असून, मंदिरांची देखभाल, जीर्णोद्धार, धार्मिक विधी आणि मठसंस्थांचे कार्य या माध्यमातून या संप्रदायाने दीर्घकाळ धार्मिक परंपरा जोपासली आहे. विशेष म्हणजे, एका शिलालेखात सलग अनेक पुरी साधूंची नावे आढळणे ही अत्यंत दुर्मीळ बाब आहे. त्यामुळे कोकणातील पुरी संप्रदायाची वंशपरंपरा, धार्मिक केंद्रे आणि स्थानिक समाजाशी असलेले संबंध याविषयी पुढील संशोधनासाठी या शिलालेखामुळे नवी दिशा मिळणार आहे. या संशोधनासाठी कुसुंबळे येथील प्रत्यक्ष स्थळ सर्वेक्षणावेळी श्रीगाव येथील स्वप्नील पाटील आणि प्रा. गीतांजली पाटील यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले असून, अशा दुर्लक्षित शिलालेखांचे दस्तऐवजीकरण झाल्यास या प्रदेशाच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासातील अनेक अज्ञात पैलू पुढे येण्यास मदत होईल.

Total Visitors :
4564839
Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *