कनकाडीत तळी बांधकामातील भ्रष्टाचाराला चाप; फेरमूल्यांकनानंतर कंत्राटदाराकडून ४९,६७४ रुपयांची वसुली

Gramin Varta
251 Views

संगमेश्वर: तालुक्यातील कनकाडी गोताडवाडी येथे १५ व्या वित्त आयोगांतर्गत करण्यात आलेल्या तळी बांधकामामध्ये अनियमितता झाल्याचा प्रकार समोर आला असून, विकास बारकू गुरव यांनी केलेल्या आंदोलनामुळे या कामाचे फेरमूल्यांकन करण्यात आले. या बांधकामाचे मूळ मूल्यांकन २ लाख २५ हजार रुपये करण्यात आले होते आणि त्यानुसार कंत्राटदार नितीन नारायण गुरव यांना रक्कम अदा करण्यात आली होती.

मात्र, कामाच्या दर्जावर आक्षेप घेत विकास गुरव यांनी प्रशासनाकडे धाव घेतली होती. या आंदोलनाची दखल घेत संगमेश्वर उपविभागामार्फत करण्यात आलेल्या फेरमूल्यांकनात या कामाची प्रत्यक्ष किंमत केवळ १ लाख ६५ हजार २१७ रुपये असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर कनकाडी ग्रामपंचायतीने कंत्राटदाराला नोटीस बजावून जादा दिलेली रक्कम सात दिवसांच्या आत जमा करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी करत संबंधित कंत्राटदाराने ४९,६७४ रुपये ग्रामपंचायतीच्या स्वनिधी खात्यात १० जुलै २०२६ रोजी जमा केले आहेत.

शासकीय निधीची झालेली ही वसुली म्हणजे आपल्या लढ्याला मिळालेले यश असल्याचे सांगत, भविष्यातही गावातील कोणत्याही गैरव्यवहाराविरोधात आपण खंबीरपणे उभे राहू, अशी भूमिका आंदोलक विकास बारकू गुरव यांनी व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधानाचे वातावरण असून, जागरूक नागरिक आणि प्रशासकीय तत्परतेमुळे सरकारी तिजोरीचे नुकसान टळल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *