वहाळ जिल्हा परिषद गटाची प्रभाग समिती बैठक १५ जुलै रोजी होणार

Gramin Varta
155 Views

सर्व विभागांचे अधिकारी एकाच मंचावर; विकासकामे व स्थानिक प्रश्न थेट मांडण्याची महत्त्वाची संधी

चिपळूण (प्रतिनिधी) :- वहाळ जिल्हा परिषद गटाची प्रभाग समिती बैठक बुधवार, दि. १५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता वहाळ हायस्कूल सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या तथा स्थायी समिती सदस्या सौ. शिवानी संदीप सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस विविध शासकीय विभागांचे अधिकारी एकाच मंचावर उपस्थित राहणार असून, नागरिकांना आपल्या गावातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न, स्थानिक अडचणी तसेच विविध शासकीय योजनांशी संबंधित बाबी थेट संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

प्रभाग समितीच्या बैठकीत रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, कृषी, बांधकाम, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, ग्रामविकास यांसह विविध विभागांतील सुरू असलेल्या व प्रलंबित विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. तसेच नागरिकांकडून मांडण्यात येणाऱ्या स्थानिक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत थेट चर्चा करून आवश्यक कार्यवाहीबाबत निर्णय घेतले जाणार आहेत.

या बैठकीस सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे विविध कार्यालयांचे उंबरठे झिजविण्याऐवजी नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व संबंधित अधिकाऱ्यांसमोर आपल्या गावातील विकासकामे, प्रलंबित प्रश्न आणि स्थानिक अडचणी मांडण्याची थेट संधी मिळणार आहे. नागरिकांच्या प्रश्नांवर जागेवरच चर्चा होऊन त्याबाबत आवश्यक कार्यवाहीसाठी दिशा निश्चित करण्यात येणार आहे.

वहाळ जिल्हा परिषद गटातील कळंबट, केरे, घवाळवाडी, देवखेरकी, नारदखेरकी, शिरवली, ताम्हणमळा, तुरंबव, गुळवणे, आबिटगाव, निवळी, मुर्तवडे, वारेली, कातळवाडी, ढाकमोली, पिलवली तर्फे वेळंब, खांडोत्री, तोंडली, पिलवली तर्फे सावर्डे, वीर, देवपाट आणि वहाळ या सर्व गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी आपल्या गावाशी संबंधित विकासकामांचे प्रस्ताव, प्रलंबित प्रश्न आणि स्थानिक समस्या लेखी घेऊन बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन सौ. शिवानी संदीप सावंत यांनी केले आहे.

विकासकामांना गती देणे, विविध विभागांमध्ये समन्वय निर्माण करणे आणि नागरिकांचे प्रश्न थेट संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, वहाळ जिल्हा परिषद गटातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या गावाच्या विकासासाठी बैठकीत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *