चिपळूण : तालुक्यातील शिरवली-येलोंडेवाडी धरण प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून, यामुळे परिसरातील पाच गावांतील शेतीसाठी पाण्याचा मोठा आधार निर्माण झाला आहे. २२५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या धरणामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. धरणाची लांबी ७०० मीटर असून उंची ४५ मीटर इतकी आहे. १५.२६ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या या धरणामध्ये सध्या ३ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणात पाण्याची चांगली आवक झाली असून, सध्या धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पाण्याचा उपयोग शिरवली, येलोंडेवाडी, देवखेरकी, नारदखेरकी आणि खरवते या पाच गावातील शेतकरी आपल्या शेतीच्या कामांसाठी करत आहेत.
या प्रकल्पामुळे पावसाचे पाणी नियोजनबद्ध पद्धतीने साठवणे शक्य होणार असल्याने शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि भूजल पातळीत वाढ होण्यास मोठी मदत मिळणार आहे. धरण पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होण्याची अपेक्षा असून, यामुळे पारंपरिक पिकांसोबतच भाजीपाला, फळबागा आणि नगदी पिकांच्या उत्पादनाला मोठी चालना मिळणार आहे. या धरणामुळे उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात करणे सोपे होणार असून परिसरातील विहिरी व बोअरवेलच्या पाणी पातळीतही सुधारणा होणार आहे. जलसंपदा विभागाचे उपअभियंता विपूल खोत यांनी दिलेल्या माहितीनुसार, या धरणाच्या पाण्यावर आधारित नळपाणी योजना राबवणे आता शक्य होणार असून, टंचाईग्रस्त भागात टॅकरने पाणीपुरवठा करणेही सुलभ होणार आहे. या प्रकल्पासाठी स्थानिक १२९ जणांनी स्वेच्छा पुनर्वसन केले आहे. धरणामुळे जलसंधारणाला चालना मिळणार असून भविष्यात मत्स्यव्यवसाय आणि पर्यटनासारख्या पूरक व्यवसायांतून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
