पुणे : परिसरातील सूस टेकडीवर शास्त्रज्ञांनी एका अत्यंत दुर्मिळ आणि नव्या वनस्पती प्रजातीचा शोध लावला आहे. ‘कॅन्स्कोरा अग्नी’ असे नामकरण करण्यात आलेल्या या वनस्पतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ही वनस्पती वारंवार लागणाऱ्या आगीशी यशस्वीपणे जुळवून घेत विकसित झाली आहे. या संशोधनामुळे गवताळ प्रदेशात लागणारी आग ही केवळ विघातक नसून, ती जैवविविधतेसाठी आवश्यक कशी असू शकते, याचा नवा दृष्टिकोन समोर आला आहे. भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे), सवाना सायन्स फाऊंडेशन आणि नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या संशोधकांनी ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून, त्यांचा शोधनिबंध ‘नॉर्डिक जर्नल ऑफ बॉटनी’ या प्रतिष्ठित संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.
संशोधनादरम्यान सूस टेकडीवर ही लहान वनस्पती आढळली. सुरुवातीला ती ‘कॅन्स्कोरा अलाटा’ या ज्ञात प्रजातीसारखी भासत असली, तरी सुमारे दहा वर्षांच्या क्षेत्रीय निरीक्षणातून आणि सखोल तुलनात्मक अभ्यासातून ही एक स्वतंत्र आणि नवीन प्रजाती असल्याचे स्पष्ट झाले. भारतीय गवताळ परिसंस्थेत नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आगी जैवविविधता टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे, हा संदेश देण्यासाठी या वनस्पतीला ‘अग्नी’ हे नाव देण्यात आले आहे. केवळ १० सेंटिमीटर उंचीच्या या वनस्पतीला पांढरी फुले येतात. ही वनस्पती ज्या भागात दर एक ते पाच वर्षांनी आग लागते, अशाच ठिकाणी टिकून राहते. विशेष म्हणजे, जिथे आगीवर नियंत्रण मिळवले आहे किंवा मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे, अशा भागात ही वनस्पती आढळलेली नाही.
या संशोधनामुळे भारतीय गवताळ प्रदेशाच्या संवर्धनाबाबत एक नवी दिशा मिळाली आहे. आयसर पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. आशिष नेर्लेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवाने हजारो वर्षांपासून गवताळ प्रदेशात आग लावून निसर्गाला आकार दिला आहे आणि त्याचा वनस्पतींना फायदाच झाला आहे. त्यामुळे गवताळ प्रदेशाचे महत्त्व समजून घेऊन त्याच्या संवर्धनासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे संशोधकांनी अधोरेखित केले आहे. सूस टेकडीवरील हा शोध केवळ वनस्पतिशास्त्राच्या दृष्टीनेच नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
