नीट परीक्षेचा निकाल जाहीर: ११.२५ लाख विद्यार्थी पात्र; महाराष्ट्रातील १८ विद्यार्थ्यांचा टॉपर्समध्ये समावेश

Gramin Varta
107 Views

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) बहुप्रतिक्षित ‘नीट’ (NEET UG 2026) परीक्षेचा निकाल गुरुवारी रात्री उशिरा जाहीर केला असून, या परीक्षेत देशभरातील एकूण ११.२५ लाख विद्यार्थी पात्र ठरले आहेत. ३ मे रोजी झालेल्या मूळ परीक्षेत पेपरफुटीचे आरोप झाल्यामुळे ती परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर २१ जून २०२६ रोजी २० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच शिफ्टमध्ये ही फेरपरीक्षा दिली होती. या परीक्षेत पंजाबच्या आर्यन गुप्ता आणि हरियाणाच्या पानशुल बन्सल यांनी ७२० पैकी ७१५ गुण मिळवून संयुक्तपणे अव्वल स्थान पटकावले आहे. ७०५ पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या पहिल्या १७ टॉप रँकर्समध्ये महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, तमिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यावर्षी यशस्वी ठरलेल्या उमेदवारांमध्ये ५८ टक्क्यांहून अधिक विद्यार्थीनी असून, ७२० पैकी ६९० हून अधिक गुण मिळवणाऱ्या १३८ विद्यार्थ्यांपैकी ९३ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे.

महाराष्ट्रातील अतुल्या बाळासाहेब डोंगरे, श्रावणी कृष्णा कुदळे, मोहनीश मारुती भोसले, सार्थक महेश पाटील, सानिध्यां क्षितिज डोंगरे, अर्णव लाहोटी, प्रणव पुरणलाल टेम्भूर्णे, रौशमीत गुप्ता, सोहम निशिकांत पाटील, सागर राजेश करीकर, सौम्या बदोले, अनुश्री अजय थोरात, आर्या अभिजित दिवेकर, सहिम सादिक पटवेगार, सुहाना सलीम शेख, अमीर वरावल्लाह, सार्थक पेठकर आणि श्रीवल्लभ विष्णुपंत गावडे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. परीक्षेला बसलेले उमेदवार आता अधिकृत संकेतस्थळ neet.nta.nic.in वर आपला निकाल पाहू शकतात. तसेच, विद्यार्थ्यांच्या मूळ ओएमआर उत्तरतालिकेची स्कॅन केलेली प्रत आणि स्कोअरकार्ड डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया आणि समुपदेशनाचे वेळापत्रक वेळेत पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा निकाल घोषित करण्यात आल्याचे एनटीएने स्पष्ट केले आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *