दापोली : तालुक्यातील हर्णे येथील राजवाडी परिसरात पुन्हा एकदा दरडीचे भीषण संकट घोंघावू लागले आहे. डोंगरमाथ्यावर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर उत्खननामुळे येथील सुमारे ६० कुटुंबांच्या जीवित व मालमत्तेला गंभीर धोका निर्माण झाला असून, ग्रामस्थ मोठ्या दहशतीखाली आहेत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने उत्खनन थांबवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
राजवाडी परिसरातील ग्रामस्थांना २०१० मधील भीषण भूस्खलनाच्या आठवणींनी आजही धडकी भरते. त्या दुर्घटनेत डोंगर कडा कोसळल्याने दोन घरे गाडली गेली होती आणि आठ निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. ही जखम अद्याप ओली असतानाच, पुन्हा त्याच डोंगराशी मानवनिर्मित हस्तक्षेप सुरू असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. उत्खननामुळे डोंगराची स्थिरता पूर्णपणे धोक्यात आली असून, कोकणातील मुसळधार पावसात दरड कोसळण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे येथील नागरिक रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून काळ काढत आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने भूवैज्ञानिक सर्वेक्षण करावे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे. डोंगर पोखरणाऱ्या दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई न झाल्यास आणि भविष्यात २०१० सारखी मोठी दुर्घटना घडल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित शासकीय यंत्रणेची राहील, असा थेट इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. प्रशासनाच्या चालढकल धोरणामुळे मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त होत असून, आता तरी यंत्रणा जागी होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
