कुवेत: मध्य पूर्वात सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणमधील संघर्षामुळे आता या प्रदेशातील इतर देशांनाही हल्ल्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच कुवैतने इराणकडून हल्ला झाल्याचा दावा केला आहे.कुवैतने शुक्रवारी याबाबत अधिकृत निवेदन जारी केले.
वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, कुवैतने शुक्रवारी सांगितले की इराणने वीज निर्मिती आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करणाऱ्या (डिसॅलिनेशन) प्रकल्पावर हल्ला केला असून त्यामुळे प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. कुवैतमध्ये पिण्याच्या पाण्यापैकी सुमारे ९० टक्के पाणी हे खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर (डिसॅलिनेशन) करून मिळते.
कुवैतने म्हटले आहे की या प्रक्रियेत कोणताही अडथळा निर्माण झाल्यास वाळवंटी आणि आकाराने लहान असलेल्या या देशातील जनजीवन धोक्यात येऊ शकते. कुवैतच्या वीज, पाणी आणि अक्षय ऊर्जा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर प्रकल्पात आग लागली आणि वीज निर्मिती करणाऱ्या अनेक युनिट्सचे नुकसान झाले. तसेच, कुवैतने सांगितले की आग आटोक्यात आणण्यात आली असून नुकसानीचे मूल्यांकन आणि प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, अमेरिकेने इराणवरील हल्ले अधिक तीव्र केले आहेत. शुक्रवारी सकाळी अमेरिकेने तेहरानमधील कारवाईचा विस्तार करत अनेक पूल आणि महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले. तसेच, इराणच्या एका महत्त्वाच्या बंदरावरील मनोरा (टॉवर) देखील पाडण्यात आला आहे.
ही कारवाई अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यांचा भाग असल्याचे मानले जात आहे. हॉर्मुज सामुद्रधुनीवरील इराणची पकड सैल करण्यासाठी आणि तेहरानवर दबाव वाढवण्यासाठी इराणच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करण्याची भूमिका ट्रम्प यांनी यापूर्वी व्यक्त केली होती.
इराणचा कुवैतमधील वीज निर्मिती व समुद्राचे पाणी गोड करणाऱ्या प्रकल्पावर हल्ला
Leave a Comment
