संगमेश्वर: भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कडवई विभागातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये मोठ्या संख्येने जाहीर प्रवेश केला आहे. कडवई बाजारपेठ येथील सभागृहात पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र प्रभाकर बोथरे यांच्यासह असंख्य ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. यावेळी प्रशांत यादव यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत करत, कडवई विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
या प्रवेश सोहळ्याला भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर, पंचायत समिती सदस्य महेश जड्यार, मंडल अध्यक्ष विनोद म्हस्के, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राहुल पवार यांच्यासह जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य आणि महिला मोर्चाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना प्रशांत यादव म्हणाले की, विकास, राष्ट्रहित आणि जनसेवेच्या विचारधारेशी जोडले गेलेले हे कार्यकर्ते पक्षाची ताकद वाढवतील. तसेच, गावाच्या विकासात या कार्यकर्त्यांचा सहभाग आणि सन्मान जपण्याची जबाबदारी पक्षाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजेंद्र बोथरे यांच्यासह जितेंद्र वारोसे, गजानन ओकटे, अनिस खान, सादिक खान आणि फिरदोस सय्यद यांच्यासह अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी विविध क्षेत्रांतून भाजपमध्ये अधिकृतरीत्या प्रवेश केला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामुळे कडवई विभागात भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक बळकट झाली असून, राजकीय वर्तुळात या मोठ्या फेरबदलाची चर्चा सुरू आहे. याप्रसंगी भाजपचे अनेक आजी-माजी पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
