लांजा/ अरबाज नेवरेकर : तालुक्यातील केळंबे विभुते स्टॉप तेलीवाडी येथे आज सकाळी १०.०० वाजण्याच्या सुमारास रिक्षा आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात रिक्षातील तिघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी लांजा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात मोटार अपघात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लांजा वैभव वसाहत येथील रहिवासी प्रशांत नारायण वाघधरे (वय ६५) हे आपली रिक्षा क्रमांक एम.एच.०८ एक्यु १८९० मधून पत्नी पल्लवी प्रशांत वाघधरे (वय ६०) आणि नातू पार्थ पारीतोष वाघधरे (वय २) यांना घेऊन लांजा ते विवली असा प्रवास करत होते. सकाळी १०.०० वाजण्याच्या सुमारास ते केळंबे विभुते स्टॉप तेलीवाडी येथे पोहोचले असता, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एस.टी. बस क्रमांक एम.एच.०८ बीटी २६६७ ने रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत प्रशांत वाघधरे, पल्लवी वाघधरे आणि लहानगा पार्थ हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. खबर देणारे पारीतोष प्रशांत वाघधरे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास श्रेणी पोउनि रेवणे हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
