सावर्डे येथील एटीएम केंद्रात वृद्धाची फसवणूक; मदत करण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून चोरले २० हजार ७०० रुपये

Gramin Varta
217 Views

सावर्डे : एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी आलेल्या एका ७२ वर्षीय वृद्धाला मदत करण्याचे नाटक करून एका भामट्याने त्यांच्या खात्यातून २० हजार ७०० रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना सावर्डे येथे घडली आहे. याप्रकरणी सिताराम तुकाराम लांबे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात इसमाविरुद्ध सावर्डे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, एटीएम केंद्रांतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिताराम लांबे हे १६ जुलै रोजी सकाळी अकराच्या सुमारास सावर्डे येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या एका अनोळखी इसमाने लांबे यांना पैसे काढून देतो, असे सांगून विश्वास संपादन केला. लांबे यांनी एटीएम कार्ड त्या इसमाकडे सोपवल्यानंतर त्याने त्यांचा पासवर्ड चोरून पाहिला. त्यानंतर अत्यंत शिताफीने आणि हातचलाखी करून त्याने लांबे यांचे मूळ एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून घेतले आणि त्यांना दुसरेच एक बनावट कार्ड देऊन तेथून काढता पाय घेतला.

लांबे हे एटीएम केंद्रातून बाहेर पडल्यानंतर काही वेळातच त्या भामट्याने चोरलेल्या एटीएम कार्डचा वापर करून त्यांच्या बँक खात्यातून २० हजार ७०० रुपये काढून घेतले. आपल्या खात्यातून पैसे गेल्याचा मेसेज आल्यानंतर लांबे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने सावर्डे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता आणि भारतीय दंड संहितेच्या कलमान्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भामट्याचा शोध सुरू केला आहे. एटीएम कार्डची अदलाबदल करून ज्येष्ठ नागरिकांना लुटणाऱ्या या टोळीचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *