रत्नागिरी: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वाहतूक व्यवस्थेचा आणखी एक नमुना शुक्रवारी सकाळी पालीजवळील कापडगाव-नागलेवाडी परिसरात समोर आला आहे. महामार्गावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ठेवलेले प्लास्टिक आणि लोखंडी ड्रम पार करताना एका ट्रकचे नियंत्रण सुटून तो थेट रस्त्यालगतच्या गटारात कोसळला.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक (क्रमांक MH-09 FL-4423) जयगड (रत्नागिरी) येथून कोल्हापूरच्या दिशेने निघाला होता. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ट्रक चालक निलेश रमेश पारकर (रा. कोल्हापूर) हे कापडगाव येथील तीव्र उतार आणि वळणावर आले. यावेळी रस्ता सुरक्षेसाठी ठेवलेले ड्रम पार करताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक थेट गटारात जाऊन आदळला.
या भीषण अपघातात चालकास कोणतीही दुखापत झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. मात्र, या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच हातखंबा पोलीस मदत केंद्राचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली.
या अपघातामुळे महामार्गावरील तात्पुरत्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत. लांजा तालुक्यातील भीषण अपघाताची धग अजूनही कायम असतानाच, महामार्गावरील अशा प्रकारच्या नियोजनामुळे पुन्हा एकदा सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह ; कापडगावाजवळ ट्रक थेट गटारात
Leave a Comment
