दापोली : तालुक्यातील खेर्डी येथील एक २२ वर्षीय तरुण आपल्या ताब्यातील रिक्षासह बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रोहन गौतम जाधव (रा. बौद्धवाडी, खेर्डी) असे बेपत्ता झालेल्या तरुणाचे नाव असून, तो १५ जुलै रोजी दुपारी २.१५ वाजण्याच्या सुमारास घरून रिक्षाने बाहेर पडला होता. चिपळूणला भाडे घेऊन जात असल्याचे सांगून तो निघाला होता, मात्र त्यानंतर तो घरी परतला नाही.
रोहन रात्री १० वाजेपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा मोबाईल फोनही ‘स्विच ऑफ’ येत असल्याने घरच्यांची चिंता अधिकच वाढली. रोहन हा MH-०८-BC-४५२६ या क्रमांकाच्या रिक्षातून प्रवास करत होता. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून तरुण आणि रिक्षाचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान, रोहन जाधव किंवा संबंधित रिक्षाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास, त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
