गिरीजा राऊत प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा; रत्नागिरी भाजपा महिला मोर्चाची मागणी

Gramin Varta
200 Views

रत्नागिरी: गिरीजा राऊत यांनी दाखल केलेल्या तक्रारीची तातडीने व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा सौ. वर्षा परशुराम ढेकणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली आहे. या मागणीचे निवेदन नुकतेच अप्पर पोलीस अधीक्षक महामुनी यांना देण्यात आले आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, गिरीजा राऊत यांनी त्यांच्यावर झालेल्या कथित अत्याचाराबाबत तक्रार नोंदवली असून हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे. या प्रकरणाचा तपास करताना कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा सामाजिक दबाव न येऊ देता, पोलीस प्रशासनाने संपूर्ण निष्पक्षतेने कारवाई करावी, असे मत सौ. वर्षा ढेकणे यांनी व्यक्त केले. तक्रारीत नमूद करण्यात आलेल्या अघोरी प्रथा, अंधश्रद्धा आणि इतर बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांची स्वतंत्रपणे आणि पुराव्यांच्या आधारे सखोल चौकशी व्हावी, अशी आग्रही मागणीही करण्यात आली आहे.

महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणात न्याय्य व पारदर्शक कारवाई होणे गरजेचे आहे. तपासाची प्रक्रिया गतिमान आणि तटस्थ राहिल्यास समाजात कायद्याचा धाक आणि विश्वास निर्माण होईल, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला आहे. यावेळी सौ. वर्षा ढेकणे यांच्यासह जिल्हा सरचिटणीस सौ. नुपुरा मुळ्ये, सौ. श्रुती ताम्हणकर, शीतल रानडे, संगीता कवितके, रुपाली कदम, स्नेहा चव्हाण, सुचिता नाचणकर यांच्यासह भाजपा महिला मोर्चाच्या अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Share This Article
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *